योगेश पाठक
१० हजार व. पू. च्या आधीच्या काळातील मानव अग्नी अन्न भाजण्यासाठी कसा वापरत होते ते आता बघू. या प्राचीन काळी सर्वात सुरुवातीला अन्न फक्त आगीच्या शेजारी किंवा निखाऱ्यांमध्ये भाजले जात होते. याचे पुरातत्वीय पुरावे म्हणजे शिकार केलेल्या प्राण्याची जळलेली हाडे / कवच किंवा वनस्पतीचे जळलेले भाग उपलब्ध आहेत. हे पुरावे साधारणतः मध्यअश्मयुगीन म्हणजे ५० हजार व. पू. पर्यंतचे आहेत.
उत्तरअश्मयुगात (साधारणतः ५० हजार ते ३० हजार व. पू.) अन्न उकळत्या पाण्यात शिजविले जाऊ लागले असा अंदाज आहे. उकळत्या पाण्यात अन्न शिजविण्याचे मुख्य उद्देश, १. हाडातून पौष्टिक अस्थि-मज्जा मिळविणे २. मांसातील चरबी वेगळी काढून तिचा पुनर्वापर करणे, हे होते. यात सुरुवातीच्या पद्धती दोन होत्या: एक म्हणजे पाणी टाकलेल्या पात्रात तापवून गरम केलेले दगड टाकले जात असत किंवा पाणी असलेले पात्र थेट अग्निवरच धरले जात असे (याबद्दल संशोधकांमध्ये थोडी मतभिन्नता आहे). इथे पाण्याचे पात्र म्हणजे प्राण्याच्या कातडीपासून बनविलेली पिशवी असा घ्यायचा आहे.
शिकार किंवा इतर कामांसाठी अश्मयुगात जी दगडी अवजारे-हत्यारे वापरली जायची ती तयार करण्याच्या प्रक्रियेतही अग्नीचे योगदान होते. उदा. फ्लिंट सारख्या दगडापासून हत्यार बनविताना तो आधी गरम केल्यास त्याला आपटून योग्य तो आकार देणे सुकर व्हायचे. आफ्रिकेतील ७२ हजार व. पू. पासूनच्या पुराव्यांनुसार दगडांवर अशी औष्णिक प्रकीया करणे हे सर्वत्र दिसते. हातोडा किंवा कुऱ्हाडसदृश दगडी अवजारे धरण्यासाठी सोपी व्हावीत म्हणून त्यांना चामडी पट्टा किंवा किंवा लाकडी काठी जोडायचे. त्यासाठी लागली जाणारी खळ हीसुद्धा आगीच्या साहाय्यानेच बनविली गेली असे पुरावा सांगतो.
शिकारीच्या सावजांना घाबरवणे-घेरणे किंवा पाहिजे तिकडे वळविणे यासाठी अग्नीचा वापर केला गेला. उदा. अमेरिकेतील आदिवासी बायसन प्राण्यांचा (शिकारीसाठी) कडेलोट करण्यासाठी आग वापरत. स्थानिक परिसरातील गवत व अन्य वनस्पती जाळण्यासाठीही आग वापरली गेली. उदा. दक्षिण आफ्रिकेतील क्लासीस नदीजवळच्या एका ठिकाणी मानवांनी जमीनीलगत वाढणाऱ्या वनस्पतींच्या वाढीस चालना देण्यासाठी अग्नीचा वापर केला. परंतु हे पुरावे उत्तरअश्मयुगाच्या शेवटच्या काळातले किंवा त्यानंतरचे आहेत.
अशा अनेकानेक कारणांसाठी नियंत्रित आगीचा वापर विशेषतः प्राचीन मानवाने सुरु केला. त्यात सरपण किंवा इंधन म्हणून गवत, सरपण, प्राण्यांची चरबी वापरली गेली. निसर्गाचे या अतिशय प्राचीन काळातही स्थानिक प्रमाणावर क्षरण सुरु झाले.
EcoUniv WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T