योगेश पाठक
अतिप्राचीन मानवाची प्राथमिक ओळख झाल्यावर आता आपण १ लाख ते १० हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन माणूस कसा राहत असेल व त्याचे निसर्गाशी कसे संबंध असतील हे बघू या. यासाठी पुन्हा अन्न, पाणी, निवारा, शिकार, अग्नीचा वापर, आणि इतर पर्यावरणीय मुद्दे लक्षात घेऊ या.
१ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वीमधला मानव हा/ही प्रामुख्याने शिकारी व अन्न गोळा करणारा अन्नसंकलक मानव होता. नियमितरीत्या जंगली वनस्पती, फळे, कंद, मुळे, बेरी, सुकी फळे, बिया यांचे संकलन तसेच लहान प्राणी आणि शक्य असेल तेव्हा मोठ्या प्राण्यांची शिकार तो/ती करत असे. त्यांच्या अन्न उपलब्धतेवर व आहारात ऋतुचक्र आणि पर्यावरणीय बदलांमुळे फरक पडलेला दिसतो.
या काळातील मानवाचे पाण्याच्या उपलब्धतेनुसार भटकणे चालूच राहीले. ते अजूनही. नद्या, झरे आणि पावसाचे तात्पुरते साठविलेले पाणी अशा नैसर्गिक स्रोतांवरच अवलंबून होते. वाळवंटी किंवा रखरखीत प्रदेशात स्थानिक जलस्रोत ओळखण्यासाठी स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांचे ज्ञान त्यांनी विकसित केले असावे.
५० हजार ते २० हजार वर्षांपूर्वीच्या काळात मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार करण्यावरील अवलंबित्व वाढले. याच्यामागे कारण बहुधा हवामानातील बदल आणि शिकारीची विकसित तंत्रे हे होते. तसेच स्वयंपाक करण्यासाठी आणि सावजाला आकर्षित करण्यासाठी आगीचा वापर जास्त होऊ लागला. किनार्यावरील मानवी लोकसंख्या पूर्वीप्रमाणेच मासेमारीवर अवलंबून होती आणि मासेमारीचे तंत्रज्ञान जास्त विकसित झाले.
पाणी साठविण्याची तंत्रे प्राथमिक स्वरूपाची म्हणजे मृत प्राण्यांचे मूत्राशय किंवा कातडीपासून बनविलेली पिशवी अशी अगदी या कालखंडापर्यंत होती.
२० हजार ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळात काही प्रदेशांमध्ये वनस्पती लागवडीची प्रारंभिक चिन्हे दिसून येतात, यात मुख्यत्वे वनातील तृणधान्य प्रजाती आणि कंद यांचा समावेश होता. तरीही, सेपियन्सच्या बहुतांश लोकसंख्येसाठी शिकार करणे आणि अन्न गोळा करणे हेच अन्नाचे मुख्य स्रोत होते.
या काळात कायमस्वरूपी जलस्रोतांच्या जवळ छावणी/तळ करून राहणे याला सुरुवात झाली. काही ठिकाणी विहिरी आणि प्राथमिक स्वरुपाच्या जलवाहिन्या खोदल्याचा पुरावाही आढळतो.
Follow the EcoUniv channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T