योगेश पाठक

‘आपण’ म्हणजे Homo Sapiens या पृथ्वीवर कधीपासून आहोत? तर साधारण ३ लाख वर्षांपासून आपली प्रजाती अस्तित्वात आहे असे मानण्यात येते. मोरोक्कोच्या जबेल इरहौद नावाच्या दुर्गम भागात, एका गुहेत सुमारे 315,000 वर्षांपूर्वीच्या पाच व्यक्तींची कवटी, हाडे आणि दात सापडले. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव आफ्रिकेत उदयास आला आणि हळूहळू जगभर स्थलांतरित झाला असे मानण्यात येते व तसे पुरावेही आहेत.

३ लाख ते १ लाख ‘व.पू.’ (म्हणजे वर्षांपूर्वी) या काळात माणूस कसा राहत असेल व त्याचे निसर्गाशी कसे संबंध असतील? यासाठी अन्न, पाणी, निवारा, शिकार, अग्नीचा वापर, आणि इतर पर्यावरणीय मुद्दे लक्षात घेऊ या.

प्राचीन मानवास अन्न गोळा करण्याच्या पद्धती कायम बदलाव्या लागत. आफ्रिकेतील सर्वात जुने सेपियन्स खाण्यायोग्य गवते, फळे, बिया, आणि छोटे प्राणी गोळा करत फिरत असत. पुढे त्यांची शिकारीची तंत्रे हळूहळू सुधारली. हरीण आणि झेब्रा यासारखे मोठे सस्तन प्राणी त्यांच्या आहारात आले.

जे मानव स्थलांतर करत होते, त्यांनी नवीन स्थानिक वनस्पती/प्राण्यांचा आपल्या आहारात समावेश केला. उदाहरणार्थ, युरोपमधील निअँडरथल्स (ते सेपियन्स नसले तरी आपल्याशी मिळतेजुळते होते), मॅमथ आणि इतर मोठ्या प्राण्यांची शिकार करत असत. जे मानव समुद्रकिनाऱ्यावर राहत होते त्यांच्या आहारात मासे आणि शेलफिशचा समावेश दिसतो.

.

अग्नी वापरून अन्न शिजवल्याने त्याची पचनक्षमता आणि पोषक तत्वांची उपलब्धता तर वाढलीच शिवाय खाद्यपदार्थांची विविधताही वाढली. तुलनेने कडक मांस आणि वनस्पती आहारात आल्या.

गोडे पाणी जवळपास असणे हे निव्वळ जगण्यासाठी महत्वाचे होतेच. पण वस्ती कुठे करायची, इतर सामाजिक संबंध, या सगळ्या दृष्टीने पाण्याची उपलब्धता महत्वाची होती. सुरुवातीच्या मानवांनी बहुधा झरे, नद्या, किंवा तलावांजवळ तळ ठोकला होता.

उन्हाळ्यात हे मानव समूह इतर प्राण्यांप्रमाणेच पाण्याच्या  शोधात फिरत होते, पाण्याजवळ तात्पुरती वस्ती करत होते. पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या वनस्पती त्यांच्या आहारात असत.

पुरातत्वीय पुरावे सांगतात की नंतरच्या काळात पाणी साठविण्याची प्राथमिक तंत्रे विकसित झाली असावीत. मृत प्राण्यांच्या शरीरातील मूत्राशय, पोखरलेला भोपळा, किंवा चिकणमातीने लिंपलेले खड्डे यासाठी वापरले जात असावेत.

Follow the EcoUniv channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T