योगेश पाठक

‘माणसाने अग्नीचा शोध लावला’ असा समज आहे पण अग्नीचा वापर सेपियन्सच्या आधीचा आहे. आफ्रिकेत होमो इरेक्टसच्या काळात, १०-१५ लाख वर्षांपूर्वी अग्नी वापरला गेला असे दिसते. पण ही बहुधा निसर्गतः तयार झालेली आग असावी, जी त्यांनी इतर हेतूंसाठी (उदा. भक्षकांना घाबरविणे) वापरली.

अग्नी नियमित रूपाने वापरला गेला दिसतो ३ ते ४ लाख व.पू. पासून. इझ्राएलच्या ‘केसेम’ गुहेत अग्नीत मांस नियमित भाजले गेल्याचे पुरावे सापडले आहेत. इथे ३ लाख व.पू.ची चूल, राखेचा पुरावा, व शिकार केलेल्या तब्ब्ल ४७४० प्राण्यांच्या हाडांचे अवशेष हे सर्व मिळाले. [संशोधन २००३, १०, १३, १६]. इथे वास्तव्य करणारे सेपियन्स किंवा त्यांच्या आधीचे मानवसदृश प्राणी असणार.

नियंत्रित आगीमुळे (उदा. शेकोटी किंवा चूल) सेपियन्सना मोठ्या भक्षकांपासून संरक्षण मिळाले, अन्न नियमितपणे भाजता-शिजविता आले, थंडीपासून ऊब मिळाली, हत्यारे बनविण्यास एक ऊर्जा स्रोत मिळाला, आणि सामाजिक आदानप्रदानासाठी, एकत्र येण्यासाठी एक जागा मिळाली.

आता या अतिप्राचीन मानवाच्या पर्यावरणीय हस्तक्षेपाकडे पुन्हा एकदा वळू या. आगीच्या सुरुवातीच्या व हेतुपुरस्सर केलेल्या वापरामुळे स्थानिक परिसंस्थेवर विशेषत: वनस्पती जळणे आणि तृणभक्षी प्राणी मरणे हा परिणाम झाला असेल. आग आणि शिकार यांच्यामुळे इतर प्रजातींचे अधिवास व संख्या काही प्रमाणात धोक्यात आले असतील (विशेषतः जिथे एखाद्या प्रजातीची संख्या एकवटली आहे असा भाग). पुराजीवशास्त्रातील पुरावा वनस्पती व प्राणी यांच्या संख्येमधील संभाव्य घट सूचित करतो.

अतिप्राचीन मानवास तेव्हाचा हवामान बदल, हिमयुगे, दोन हिमयुगांमधील काळ, यांनाही तोंड द्यावे लागले. त्यांची संख्या कमीजास्त झाली असेल, तरीही ते तग धरून राहीले म्हणजे त्यांनी हवामानानुसार आपले आचार-विचार, आहार-विहार यात बदल केले असणारच.

See insights and ads

Boost post

Follow the EcoUniv channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T