योगेश पाठक
१ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वीचा मानव आगीचा नियंत्रित वापर मुख्यत्वे थंडीपासून उब मिळविण्यासाठी आणि अन्न शिजविण्यासाठी करत होता.
५० हजार ते २० हजार वर्षांपूर्वीच्या काळात मानव आगीचा नियंत्रित वापर मोठ्या प्रमाणावर आणि अनेक कारणांसाठी करू लागला होता. उदा. अन्न भाजणे/शिजविणे, अवजारे बनविणे, दिव्यांसाठी, आणि भक्षकांना दूर पिटाळण्यासाठी. या काळात शिकार सोपी व्हावी म्हणून वन/गवताळ परिसंस्था अंशत:जाळण्यासाठीही आग वापरली गेली असावी असा अंदाज आहे.
२० हजार ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळात नियंत्रित आग हा आपली संस्कृती आणि तंत्रज्ञान याचा अविभाज्य भाग बनला होता. झाडे-झुडपे-गवत जाळून जमीन मानवी वापरासाठी मोकळी करण्यासाठी, अवजारे-हत्यारे बनविण्यासाठी, आणि संदेश पाठविण्यासाठीही आग वापरली जाऊ लागली होती.
वरील सर्व बदल होत असताना १ लाख ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळातील प्राचीन मानवाचा पर्यावरणावर एकंदर परिणाम काय झाला असेल त्याचा आढावा घेऊ या.
१ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या काळात आपली लोकसंख्या अजूनही कमी होती व जीवनशैली भटकी होती. त्यामुळे आपला पर्यावरणावरील परिणाम तुलनेने कमी होता. भटक्या मानवांचे तळ जिथे होते त्याच्या आजूबाजूस नैसर्गिक संसाधनांची क्षिती झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
५० हजार ते २० हजार वर्षांपूर्वीच्या काळात शिकार करणाऱ्या मानवांचे गट मोठे होऊ लागले, जास्त प्रमाणात शिकार होऊ लागली (कारण ती विभागली जायची) आणि शिकारी विशिष्ट सावजांमागे पाठलाग करत जात असत. यामुळे स्थानिक नैसर्गिक संसाधने कमी होऊ लागली - उदा. काही विशिष्ट प्राणी. तसेच आगीचा वापर वाढल्याने स्थानिक परिसंस्थांमधील वनस्पती व प्राणी यांची संख्या कमी होऊ लागली.
२० हजार ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळात वनस्पतींची लागवड (शेती) आणि मानवी वसाहतींसाठी झाडोरा तोडून जमीन मोकळी करणे हे पर्यावरणातील हस्तक्षेप सुरु झाले होते. यामुळे मृदेचे क्षरण आणि स्थानिक परिसंस्थांचा अंशतः नाश सुरु झाला होता.
EcoUniv WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T