योगेश पाठक
१ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वीमधला मानव अजूनही प्रामुख्याने गुहा, खडकांमधील सुरक्षित जागा आणि झाडाच्या फांद्यासारख्या नैसर्गिक सामग्रीपासून बनवलेले घर यातच राहत असे. आता त्यांच्यात उष्णकटिबंधीय जंगलांपासून ते बर्फाळ मैदानापर्यंत विविध वातावरणांशी जुळवून घेण्याची क्षमताही येऊ लागली होती.
या काळात मोठ्या पशूंच्या मृत शरीराचा अन्न म्हणून वापर सुरूच राहिला. त्याबरोबरच प्राथमिक प्रकारचे भाले, धनुष्यबाण, आणि सापळे यांच्या साहाय्याने लहान प्राण्यांची शिकार सुरु राहिली.
५० हजार ते २० हजार वर्षांपूर्वीच्या काळात लाकूड, प्राण्यांची हाडे आणि चामड्यांपासून बनवलेल्या अर्धवट स्थायी स्वरूपाच्या संरचनांचे पुरावे दिसू लागतात. उष्णतेसाठी आणि भक्षकांपासून संरक्षणासाठी अग्नीचा वापर थंड प्रदेशात नियमितपणे केलेला आढळतो.
या काळात शिकारीची तंत्रे सुधारली. गटाने एकत्र शिकार जास्त प्रमाणात केली जाऊ लागली. शिकारीची शस्त्रेही विकसीत झाली. प्राण्यांचा माग काढणे, एखाद्या विशिष्ट सावजाची हेरून शिकार करणे हे काही प्रदेशात होऊ लागले.
२० हजार ते १० हजार वर्षांपूर्वीच्या काळात प्राचीन मानव सुरुवातीच्या स्थायी स्वरूपाच्या झोपड्या बांधू लागला. अशा झोपड्यांमध्ये खड्डेसुद्धा दिसून येतात. कदाचित ते मलमूत्रविसर्जनासाठी असतील किंवा अन्नाच्या साठवणीसाठी. उष्ण हवामानात चिकणमाती आणि मातीच्या विटांचा वाढता वापर दिसून येतो.
प्राणी पाळण्याची आता सुरुवात झाली होती. विशेषतः कुत्र्यांचा शिकारीसाठी वापर होऊ लागला. जंगली प्राण्यांची शिकार सुरूच राहिली.
Follow the EcoUniv channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T