योगेश पाठक

३ लाख ते १ लाख ‘व.पू.’ मधल्या माणसांनी झोपड्या किंवा घरे बांधायला अर्थातच सुरुवात केली नव्हती. त्यांची घरे म्हणजे गुहा किंवा खडकांच्या मागे तयार झालेल्या सुरक्षित जागा. वारा-पाऊस-ऊन आणि वनातील मोठे भक्षक यांच्यापासून संरक्षण देणाऱ्या जागा त्यांनी विचारपूर्वक निवडल्या असतील. इथे हे लक्षात घ्यायला हवं की ‘उत्क्रांतीच्या झाडा’वरचे, आता नामशेष झालेले, इतर मानवसदृश प्राणीही (hominins) तेव्हा अस्तित्वात होते. उदा. निअँडर्थल्स किंवा डेनिसोव्हन्स. सेपियन्स त्यांच्याबरोबर अशा गुहांमध्ये एकत्र राहिले असतील ही शक्यताही नाकारता येत नाही.

हळूहळू निवारा ‘तयार करण्याची’ सुरुवात झाली. कदाचित ही ओरँगउटान किंवा इतर प्राणी रोज आपला निवारा पानांपासून तयार करतात ते बघूनही झाली असेल. फांद्या, पाने आणि प्राण्यांची हाडे वापरून साधे निवारे प्राचीन मानव तयार करत असे. त्या-त्या प्रदेशात उपलब्ध असलेली नैसर्गिक सामग्री आणि हवामानानुसार निवाऱ्याचे प्रकार बरेच बदलू शकतात. उदा. थंड प्रदेशात शिकार केलेल्या मोठ्या प्राण्यांचे कातडे थंडीपासून आवरण म्हणून वापरले गेले असावे. प्राण्यांची शिकार करणे आणि पाने-फांद्या निवाऱ्यासाठी तोडणे हा मानवाचा पहिला पर्यावरणीय हस्तक्षेप म्हणता येईल.

‘शिकारीची तंत्रे हळूहळू सुधारली’ असे आपण म्हंटले, पण ती कशी? शिकारीसाठी योग्य असे ‘भाल्याचे टोक’ हा शोध तर सेपियन्सच्याही पूर्वीचा आहे असे पुरावा सांगतो. ‘दगडाचे टोक’ असलेला भाला मानवाचे पूर्वज साधारण ५ लाख वर्षांपूर्वीही वापरात होते असा निष्कर्ष २०१२ मध्ये University of Toronto च्या एका पुरातत्वीय अभ्यासात निघाला. हे पूर्वज म्हणजे ‘उत्क्रांतीच्या झाडा’वरचे आपले आणि निअँडर्थल्स यांचे सामायिक पूर्वज असावेत. (नुसत्या टोकदार काठीचा उपयोग भाला म्हणून आत्ताच्या जर्मनीच्या प्रदेशात ६ लाख वर्षापूर्वी केलेला आढळतो).

या शोधामुळे व भाल्याच्या टोकातील सुधारणांमुळे शिकार जास्त नियमितपणे करता आली व जास्त चांगले मांसही आहारात आले. याचा संबंध सेपियन्सच्या मेंदूच्या आकारातील वाढीशी काही वैज्ञानिक जोडतात. शिकार फक्त मांसासाठी नव्हती. प्राण्यांची कातडी, हाडे (हत्यारे-अवजारे यांच्यासाठी), आणि हाडांतला मगज (एक पौष्टिक द्रव्य म्हणून) हेही तितकेच महत्वाचे होते.

मानवांतील सहकार्य आणि पद्धतशीर योजना बनविणे याचाही फायदा शिकारीसाठी होत चालला. प्राण्यांना सापळ्यात अडकवणे, नैसर्गिक अडथळ्यांमध्ये नेणे किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नी वापरणे या सर्व युक्त्या मानवाने वापरण्यास सुरुवात केली.

Follow the EcoUniv channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T