योगेश पाठक

प्रागऐतिहासिक मानवाकडे (१०००० व. पू. पुढे) जाण्याआधी आपण अतिप्राचीन व प्राचीन मानव आणि त्यांचे निसर्गाशी असलेले संबंध हे जरा खोलवर, पुराव्यांच्या साहाय्याने जाणून घेण्याचा  प्रयत्न करू या. आगीपासून सुरुवात करू.

नैसर्गिकरित्या लागलेली आग पाहणे (उदा. वीज चमकणे, त्यापासून वणवा लागणे), तिचे कुतूहल व भीती वाटणे, अशा रीतीने आदिमानव (Homo Erectus), सेपियन, इतर कपी, खरंतर इतर सर्व प्राणी यांची आगीशी पहिली ओळख झाली. आदिमानव व अतिप्राचीन मानव यांनी मात्र ती आग लाकडावर पकडून इतरत्र वापरलेली दिसते.

कोळसा, जळल्या-भाजल्या गेलेल्या माती व चिखल यांचे अवशेष किंवा थर,आणि दगड-खडकांवर दिसणाऱ्या आगीच्या खुणा हा आपल्याकडे असलेला प्राचीन आगीचा पुरावा आहे. अशा अवशेषांचे कार्बनी कालमापन करावे लागते मगच ती आग अंदाजे केव्हा पेटवली गेली होते हे आपण सांगू शकतो. आधुनिक पुराणवस्तू व मानववंशशास्त्रज्ञ हे वास्तवाधिष्टित अभ्यास (actualistic study) तसेच सूक्ष्ममृदाशास्त्र (micromorphological study) या तंत्रांचा प्राचीन आगीच्या अभ्यासात वापर करतात.

तीन लाख व.पू. ते चौदा लाख व.पू. या कालावधीतील आगीचे काही पुरावे मिळाले आहेत, परंतु ते पुरावे तुरळक आहेत, ठोस नाहीत व त्यांच्याबद्दल काही वेळा संशोधकांमध्येच मतभिन्नता आढळते. त्यामुळे मानवाशी संबंधित ३ लाख व.पू. नंतरच्याच पुराव्यांवर लक्ष केंद्रित करणे उचित ठरते.

उष्णता मिळविणे हे नियंत्रित आगीचे मुख्य उद्दिष्ट होते. अश्मयुगाच्या सुरुवातीच्या काळात आगीच्या चुली/भट्ट्यांमध्ये तळास दगड दिसून येत नाहीत, तर उत्तर अश्मयुगात (५०-१०००० व.पू.) मध्ये ते दिसून येतात. अशा दगडी तळामुळे उष्णता जास्त काळ टिकते हे लक्षात आले असावे.

आगीपासून प्रकाश मिळविणे हे दुसरे उद्दिष्ट. प्रकाश हा दिवा किंवा मेणबत्त्या या दोन प्रकारे मिळविला जायचा. खडकांमधील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित खोबणीमध्ये लावलेल्या दिव्यांचा पहिला पुरावा ४० हजार व.पू. चा आहे.

मेणबत्तीची संकल्पना येण्याआधी नैसर्गिक मेण प्रकाश देण्यासाठी वापरले गेले असणारच. युरोप, आफ्रिका, व आशियातील काही गुहांमधील भित्तिचित्रांमध्ये मेणाचा शोध घेणारी, पोळ्याजवळ आग नेणारी माणसे दिसतात. यांचा काळ साधारण १० हजार व. पू. किंवा नंतरचा आहे. याच्या बऱ्याच आधीपासून माणूस पोळ्यांतून मेण (व अर्थातच मध) गोळा करत असावा.

EcoUniv WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9jxtc72WU451ez6j3T