योगेश पाठक
रशियाच्या ‘स्टेपी’ जंगलाच्या मैदानी प्रदेशात कोस्तेस्की येथे पुरातत्वीय उत्खननादरम्यान वैज्ञानिकांना एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचना सापडली (संशोधन मार्च २०२०). ही रचना म्हणजे तब्बल ६० वुली मॅमथ च्या हाडांपासून बनवलेले मोठे वर्तुळ असून त्याचा व्यास सुमारे ४० फूट आहे. २५,००० वर्षांपूर्वी कडाक्याच्या थंडीच्या काळात राहणाऱ्या अन्नसंकलक मानवांच्या टोळ्यांनी हे बांधकाम का केले असावे, या प्रश्नाचे ठोस उत्तर देता येत नाही.
यूकेच्या एक्सटर विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रज्ञ, अलेक्झांडर प्रायर यांनी या शोधाबद्दल म्हटले आहे, "या वास्तुनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि श्रम खर्च केला गेला आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे यामागची कारणे निश्चितच त्या काळातील लोकांसाठी महत्वाची असावीत."
पूर्व युरोप, युक्रेन, व रशिया येथे अशी इतर अनेक वर्तुळे सापडली आहेत. प्रत्येकाचा व्यास काही मीटर तरी आहे. सगळ्यांचा काळ २२ ते २५००० व. पू. आहे. शेवटचे हिमयुग संपत असताना थंडीपासून बचाव म्हणून कदाचित अशी वर्तुळे उभारण्यात आली असावीत.
पण ही विशाल अस्थी वास्तू रचना इतक्या मोठ्या प्रमाणात आढळलेली अशी पहिलीच रचना आहे. या वर्तुळाची उंची २० इंच असेल असा अंदाज आहे. इतक्या हाडांचा साठा जमवण्यासाठी स्थानिक अन्नसंकलक लोकांनी अर्थातच अनेक मॅमथची शिकार केली असावी, किंवा कदाचित जंगलात मेलेल्या मॅमथची हाडे त्यांनी गोळा केली असावीत. वर्तुळाच्या आत अग्नी पेटविला गेल्याचा पुरावा तसेच गाजर, बटाटा आदी भाज्यांचे तुकडे मिळाले आहेत. वर्तुळाच्या बाहेर खड्डे तयार केलेले आहेत. अन्नसंकलक मानव अशा खड्ड्यात अन्न साठवून ठेवत असे. ते कदाचित मॅमथचे मांस असेल. हे मांस आगीवर भाजले गेले असेल. मॅमथच्या हाडांतील चरबी आग पेटवण्यासाठी वापरली गेली असेल.
रेनडिअर, घोडा, अस्वल, लांडगा, लाल कोल्हा, या सर्वांची हाडेही येथे काही प्रमाणात सापडली आहेत. येथून जवळ वर्षभर वाहणारे झरेही आहेत. कदाचित येथे कायमस्वरूपी मानवी वस्ती असेल.
मॅमथ व इतर अनेक प्रजातींचे शिरकाण मानवी शिकारीमुळे झाले असावे या सिद्धांतास यामुळे बळ मिळते.