योगेश पाठक
प्राचीन अन्नसंकलक मानव व त्याच्या सभोवतीचा निसर्ग यांचे संबंध कसे होते? हा फेरफटका आता आपण काही विशिष्ट प्राचीन समाज/संस्कृती यांना भेट देऊन करणार आहोत. अर्थात हे मानवसमूह ‘समाज’ किंवा ‘संस्कृती’ होते असे म्हणायलाच विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांचे काही पक्के पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत इतकेच.
अमेरिकन खंडात प्रथम येणाऱ्या सेपियन्सना ‘क्लोवीस लोक’ अशी संज्ञा आहे. सायबेरिया आणि अलास्काला जोडणारी बेरिंग समुद्रधुनी पार करून हे लोक अमेरिकेच्या उत्तर टोकावर साधारण १३,५०० व.पू. आले. त्यानंतर १२,८०० व. पू. पर्यंत क्लोवीस लोकांची हस्तिदंत व प्राण्यांची हाडे यापासून बनविलेली विशिष्ट हत्यारे उत्तर अमेरिका खंडातील अनेक ठिकाणी दिसतात. ही अनेकविध हत्यारे मॅमथ व हत्ती वर्गातील इतर प्राणी यांची शिकार करण्यासाठी वापरली जात होती याबद्दल संशोधकांमध्ये मतैक्य आहे. त्यांनी मोठा बायसन, घोडा, तापीर, अस्वल, तसेच ससा, उंदीरवर्गीय प्राणी, यांचीही शिकार केली असे पुरावा सांगतो (मुख्यतः या प्राण्यांची हाडे).
हे ‘क्लोवीस पॉईंट्स’ म्हणजे क्लोवीस लोकांबाबतचा मुख्य पुरावा होय. या अवजारांवर आधारित इतर अनेक निष्कर्ष व क्लोवीस समाजाबाबत बांधलेली अनुमाने, इकडॆ न जाता आपण निसर्ग-मानव-तंत्रज्ञान या आंतरछेदाकडे बघू या.
२०१७ मध्ये प्रकाशित झालेले बुकॅनन व इतर यांचे संशोधन सांगते की उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात तेव्हा प्राणी व वनस्पती यांची विविधता जास्त होती, अधिवासांची विविधता जास्त होती, त्याचे प्रतिबिंब अन्न मिळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोवीस पॉईंट्सच्या विविधतेत दिसते. याउलट उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात जैवविविधता कमी होती तर क्लोवीस पॉईंट्सची विविधताही तुलनेने कमी आढळते.
परिसरातील विविधतेबद्दल एकमेकांकडून शिकण्याचे प्रमाण पश्चिम भागात जास्त तर वेगवगेळ्या अधिवासात राहून वैयक्तिक किंवा छोट्या गटात हत्यारे विकसित करणे हे पूर्व भागात जास्त आढळते. पश्चिम भागात सेपियन्स एकमेकांच्या अवजारांची ‘नक्कल’ जास्त करताना आढळतात. यावरून दिसते की प्राचीन सेपियन्स ज्या अनेकविध भू-चित्रांमधून प्रवास करत होते, त्यामुळे त्यांचे सहकार्य, शिकण्याची पद्धत, हत्यारे बनविणे या सगळ्यावर स्थानिक निसर्गाचा प्रभाव पडत होता.
या कालावधीत अमेरिकेतील ३५ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती संपल्या. परंतु त्यास मुख्य कारण म्हणजे क्लोवीस लोकांनी केलेली शिकार की हिमयुगाच्या शेवटच्या काळातील पर्यावरणीय बदल (या प्राण्यांना नवीन हवामानास जुळवून घेण्यात आलेले अपयश) हा प्रश्न ठोस, तर्कसंगत पुराव्याअभावी आजही अनुत्तरित राहतो.
२०१० नंतरच्या संशोधनाच्या आधारे ‘अमेरिकेत सर्वप्रथम क्लोवीस लोक आले’ या अनुमानालाच आव्हान मिळाले आहे. त्याआधीही सेपियन्स अमेरिकेत आले होते असे पुरावे आता सापडले आहेत. परंतु क्लोवीस लोकच पुढे ‘नेटिव्ह इंडियन्स’ झाले याबद्दल एकमत आहे. आजच्या नेटिव्ह इंडियन्सची जनुके व क्लोवीस लोकांचे सांगाडे इत्यादीवरून समजलेली त्यांची जनुके यात जवळजवळ ८०% साधर्म्य आढळते.